Saturday, July 9, 2011

‘मनःशांती'

मनःशांती बद्दल बरेच लिहिले - बोलले - चिंतले- चर्चिले जाते. मुळात मनःशांती म्हणजे काय? ती कशी असते? ती कशाने नसते? हे सर्व प्रश्न यात समाविष्ट असतात.

आजूबाजूला पहाता हे प्रश्न सर्वच माणसांना पडलेले असतात का? तर उत्तर येते ' नाही '.

काहींना या प्रश्नापर्यत पोचताही येत नाही तर काहींच्या बाबतीत या प्रश्नांना त्यांच्यापर्यंत पोचता आलेले नाही असे दिसून येते.

पहिल्या अर्धभागात अन्न , वस्त्र , निवाऱ्यांचे प्रश्नच ज्यांचे मिटले नाही येत असे लोक मोडतात. मन आणि त्याची शांततेची गरज ही त्यानंतर येणारी गोष्ट आहे त्यामुळे बहुसंख्य मंडळींना तिथपर्यंत पोचताच न आल्याने म्हणजे शारीरिक जगण्याच्याच गरजा नीटशा न भागल्याने मन उपाशी अशांतच रहाणार. हे जाणवले तरी ते तसे असणारच हे मान्यच करून रहावे लागते. किंबहुना खरेतर एके प्रकारे एका पातळीवर ही शांतता / शांति मिळाल्यातच जमा झालेले असते!

दुसऱ्या अर्ध भागात काही लोक असेही भेटतात की ,त्यांचे हे सर्व मुलभूत प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि तरीही मनाला काही प्रश्नच पडलेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नाबद्दल अस्वस्थ होऊन विचार करावा त्याची उत्तरे शोधावीत आणि मग शांत व्हावे असे सुद्धा त्यांना वाटत नाही. याचा पडताळा जेव्हा अशा प्रकारे प्रश्न व त्याची उत्तरे याबद्दलचे लिखाण चर्चा -इ . मध्ये रस घेणारी त्याची जाण असणारी मंडळी किती कमी असतात हे दिसते तेव्हा येतो. त्यामुळे दोन्ही प्रकारात माणसाला मन असूनही ते प्रश्नांपासून कसे अन किती दूर राहू शकते हे दिसते. असे असले तरी काहीं थोड्यांना हे प्रश्न पडलेले असतात हे नक्की. असे असले तरी मन आणि शांति या बद्दल थोडे वाटले ते असे.

मन हे एक अजब इंद्रिय आहे.त्याबद्दलही खूप काही समजण्याच प्रयत्न केला गेला आहे आणि अजूनही चालूच आहे. रोजच शास्त्राला मना विषयी नवे काही काळात आहे!

पण,मन ही फक्त मनुष्य प्राण्याला मिळालेली देणगी आहे म्हणावे की शाप?

शिवाय, त्याच्या मनोव्यापारांच्या गुंत्यातून त्याला आणि सृष्टीला जो काही 'ताप' होतो आहे आणि होणारही आहे तो टाळण्याच प्रयत्न करावा की तो अटल आहे म्हणून स्वीकारावे? असेही प्रश्न पडतात.

मन म्हंटले की भावना आल्या मग विचारही त्याचेच हे अपत्य!

या विचारामुळेच काही कृती घडतात आणि या आणि या कृतिमुळेचकाही ना काही घडत रहाते - - - - - - - -या घटनांचे पडसाद म्हणून पुन्हा काही तरी घडते -- - - घडत रहाते.

यातून मनात पुन्हा खळबळ माजते ,शांति ढळते ,हे चालूच रहाते.

मला वाटते ‘शांति ‘ही एक क्षणिक अवस्था असावी. प्रत्येक Interaction च्या शेवटी येणारी -- - - (याविशी वाटणारी)

खरे तर माणसाला प्रत्येक परिस्थितीत आनंद - - - तणाव विरहीत शेवट व्हावा असे वाटते . म्हणजेच शेवट ' सुखान्त' किवां 'गोड ' व्हावा असे वाटते

पण, प्रत्येक परिस्थितीत हे होणे शक्य नसते कारण, प्रत्येक जण आपापल्या मनाच्या स्थितीनुसार कुवतीनुसार म्हणजेच ' यथा बुद्धी--- यथा शक्ती ' प्रत्येक क्षणाचा सामना करीत असतो. त्यात विविधता असते. शिवाय एक Given situation मध्ये एखाद्या नाटका प्रमाणे अनेक पात्रे काम करीत असतात. त्यामुळे गुंतागुंत वाढलेली असते.

त्यामुळे ही So Called-तथाकथित Win- Win Situation सारखी सारखी पदरात पडत नाही. अन सदा सर्वकाळ सर्वांच्याच आनंदाची असू शकत नाही, हे असणे कितीही हवे असले तरी .त्यामुळे ' शांति ' ही तेवढीच अल्पायुषी असल्यामुळे क्षणिक अनुभवायची गोष्ट आहे.

एकदा क्षणिक शांत वाटले, प्रश्न उकलल्यासारखे वाटले ,तरी पुन्हा पुढच्याच क्षणी ही शांति दुसऱ्या कुठल्यातरी प्रश्नाने ढवळून निघते.

उदा . पहा ही शांति किती छान आहे म्हणेतोवर आता ही टिकून तर राहिलं ना?असे वाटते .हीच ती अशांति? असो .

या शांति विषयी विचार करताना मला ती मोक्ष या संकल्पनेशी जोडण्याचा मोह टाळता येत नाही.

' शांति ' म्हणजेच एक क्षण ' मोक्ष ' नव्हे काय?

माझ्या मते , मनामधले काहूर संपले- - द्वंद्व संपले - - विचार ' एक ' पक्का झाला की जे काही ' मोकळे ' वाटते तो मोक्षाचा क्षण आणि तोच मनः शांतीचाही क्षण .!

पुढे कितीही लढाया लढायचा असल्यास - - कसलेही कठीण प्रसंग असले तरी Whole Brain Thinking च्या अंती घेतलेली निर्णय हा किती ' हायसे ' वाटू देणारा असतो ! याचा आपण सर्वानीच कधीना कधी अनुभव घेतलेला आहे.

हाच तर तो मोक्षाचा क्षण असावा का ? हीच मनाची अवस्था उच्च मनः शांतिची असावी का ?

कसोटी पहाणारे प्रसंग तर दररोज हरघडी आपल्याला आपल्या आयुष्यात समोर येत रहातात . त्यावर काही तरीAction घेतली जाते . मेंदूच्या पूर्ण क्षमतांना एकवटून जे निर्णय घेतले जातात ते असेच मनाला बळ देणारे आणि त्याच वेळी त्याला शांतही करणारे असतात अशा वेळी हातून होणाऱ्या कृति या मनाला समाधानच नव्हे तर आनंदही - - - देणाऱ्या असतात ,यालाच क्षणिक ' मोक्ष ' का न म्हणावा ?.

असे मोक्षाचे क्षण गोळा करत करत मोठा मोक्षच पदरात साठत जाईल ; हाच तो So Called मुक्ती -मोक्ष !

आणि मग आपण नेहमी जो मोक्ष मिळालेला माणूस पहायला मिळत नाही म्हणून तक्रार करतो तो स्वतः लाच अनुभवायला मिळेल अन लोकांनाही ते दिसून येईल.

हे समजायला - अन - - समजवायला थोडे सोपे वाटत नाही का?

ही शांति- अन मोक्ष अशा संकल्पनांची मला झालेली उकल.

असे एकदा समजले की शांति ही गोष्ट Labile =क्षणभंगुर आहे. हे स्वीकारायला जमेल आणि ती आपणच कशी पुन्हा पुन्हा प्रस्थापित करायची आहे हे ही कळेल . शिवाय ही ' शांति ' आपल्यालाच हवी असल्याने - - किंबहुना ती आपलीच मानसिक गरज असल्याने ,ती मिळवल्याचे प्रयत्न आपणच करायला हवेत हे ही पटेल आणि मग आपल्या प्रत्येक कृतीला आपणच जबाबदार आहोत आपली मनः शांति कशामुळे गेली आहे अन काय केले असतं आपल्या कृति या ढललेल्या ' शांति ' ला पुन्हा जागेवर बसवू शकतील याचा विचार होऊन मग तशी कृति होईल, आणि या प्रयत्नानंतर जी मानसिक अवस्था प्रयत्नपूर्वक आणलेली असेल तिचा आनंद अधिक समाधानाने घेता येईल, हा आपलाच मानसिक विजय असल्यामुळे! एकदा या विजयाची चव चाखली की ती मिळवण्याकडे कल अन प्रयत्न रहातील. कारण, प्रयत्नांशिवाय आपोआप मिळणारी अन टिकणारी ती गोष्ट नव्हे.

आता एका निराळ्याच ' अशांति ' किवां ' शांति नसणे ' याकडेही पाहू. मनुष्याला खरे तर शांति हवी आहे . शक्यतो संघर्ष नको आहे. असे असतानाही काहींना नेहमीच, तर बऱ्याच जणांना कधी कधी , तर काहींना कधी ना कधी अशांतीने घेरले आहे.

जगातल्या सर्व कलाकृती या ( अस्वस्थेतूनच) अशांतीतूनच जन्माला आल्या आहेत. तसेच सर्व शोधही अशांतीतूनच लागले आहेत. या मंडळींना तसे पहिले तर या गोष्टी कुणी करायला सांगितल्या होत्या का? किवां अगदी अशाच भव्यदिव्य , उतुंग अद्वितीयच व्हायला हव्यात असा आग्रह दुसऱ्या कुणी धरला होतं का? ही तर ज्याची त्याची तेव्हाची गरजच होती. ती गरज म्हणजेच अशांति. चांगल्याचा , परिपूर्णतेचा नाविन्याचा ध्यास म्हणजे आणखी वेगळे ते काय?

अशा अशांतीलाच ' बेचैनी ' ही म्हणता येईल? या पोटीच जगात काही ना काही नवे घडत रहाते. सुधारणा किवां कधी कधी तर चक्क ह्रास ,संहार किंवा विनाशही पदरी पडतो! याला इतिहासातल्या विघातक घटना साक्षी आहेत. या सर्वांच्या मुळाशी जाऊन पहिले तर कारणभाव हा ' अशांतीच' सापडतो.

सर्व सर्जनशील व्यक्ती तर बहुतांशी अशांतच असतात. नवनिर्मितीचा आनंद म्हणजे ' शांति ' थोडाच वेळ टिकते. लगेच ही मंडळी अशांत अस्वस्थ होतात आणि आपोआप कामालाच लागतात, मग ही अशांति नकोशी कशी म्हणावी ?

उलट , काही न सुचणारी - - -निष्क्रिय ठेवणारी शांति नको! ती अशांति परवडली, असेच ही मंडळी म्हणतील !

शांति - - अशांति - - शांति अशा आंदोलनात सापड्लेल्यानाच आणि त्या आंदोलनाची Frequency वारंवारिता अनुभवलेल्यांनाच शांतिची आणि अशांतीची खरी ' चव ' कळेल . आणि मग फक्त मनाला शांतीच हवी असा आग्रह कसा फोल आहे हे ही.

शांति- -अशांति ची आंदोलने फारच सौम्य असतील तर ती जाणवतही नाहीत .जितकी अशांति अधिक तितकी ' शांति ' ही खोल !

सारखीच अशांती जशी नको ,तशीच सारखीच शांतीही नको.

अशांति पोटी काही चांगले निर्माण झाले तर नंतरच्या शांतिला अधिक मूल्य आहे अन्यथा होणाऱ्या विघातक - - नकारात्मक निर्मितीत - - पश्चाताप दुःख या भावना त्या शांतीला ग्रासून त्याचे मूल्य एकदमच उणे करून टाकतात.

काही प्रश्न वाचकांना विचार करायला सोडून थांबते

सतत मिळत राहणाऱ्या किवा साठत जाणाऱ्या अशांती अस्वस्थेचे पर्यवसन किवा सारख्या मिळत राहणाऱ्या शांतीचे पुढे काय होत असेल?

जगात सर्व शांतीच आहे असे वाटू लागले तर? किवा असमाधान शिल्लकच राहिले नाही तर? किवा सर्वच सृष्टीचे आकलन झाले तर, (किमान असे ' वाटत ' राहिले तर ) मंडळीना ‘आता पुरे:’ किवा ‘बस! ‘असे वाटत असेल का? त्याची सर्जन शीलता संपत असेल का? याच ' शांती ' पायी अशा सर्व अर्ध विरामांच्या साखळीला पूर्ण विराम येत असेल का?

डॉ. ज्योत्स्ना पडळकर

9049231273